सुप्रिम कॉलनीत बंद घर फोडणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीत बंद घर फोडून घरातील संसारोपयोगी वस्तूची तोडफोड करत दीड लाख रूपयांची रोकड लांबविणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, परवीन शाहरूख पटेल (वय-२५) रा. पांडे किरणा दुकान शेजारी, सुप्रिम कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १४ ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने ते घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान या परिसरात राहणारा संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (वय-२१) याने रात्री ११ वाजेच्या सुमारास परवीन पटेल यांचे बंद घरात कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर घरातील डब्यात ठेवलेले दीड लाख रूपयांची रोकड चोरून नेली. हा उघडकीला आल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप‍ शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा गुन्ह्याची उकल करण्यात आली. हा गुन्हा याच परिसरात राहणारा संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर यानेच केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, दत्तात्रय बडगुजर, सुधीर साळवे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी संजेश उर्फ शंकर प्रकाश कंजर (वय-२१) याला बुधवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सुप्रिम कॉलनीतून अटक केली. त्याच्यावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला न्या. जे.एस. केळकर यांनी पोलीस कोठडी दिली आहे. सरकारतर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

Protected Content