सीबीआय आणि ईडी भाजपचे सदस्य आहेत का? : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी । अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे टाकल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडत सीबीआय आणि ईडी हे भाजपचे सदस्य आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर आज सकाळीच अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केंद्र सरकारवर टीका केली.

जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयसाठी अयोध्येतील महापौर उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेला जमिनीचा व्यवहार अत्यंत योग्य प्रकरण आहे. तिथेसुद्धा या केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. आणि फक्त महाराष्ट्राच्याच कार्यकारिणीने कशाला तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अयोध्येत जो जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्याचा सीबीआय आणि ईडीकडून तपास करावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

भाजपाच्या राज्य कार्यकारिणीत सीबीआयचा ठराव झाला त्याचं आश्‍चर्य वाटतं. त्यांनी सीबीआय आणि ईडी हे त्यांच्या पक्षाचे सदस्य आहेत असं त्यांना वाटत आहे का? आम्ही सांगू तसंच केलं जाईल असं त्यांना वाटत असेल. पण यामध्ये सर्वात जास्त अवमूल्यन सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं होत आहे हे स्पष्ट दिसत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Protected Content