मुंबई वृत्तसंस्था । सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्यानंतर आता सीबीआयची टीम उद्या मुंबईत येणार आहे. ही टीम उद्या मुंबईत येऊन सुशांतच्या घराची पाहणी करून नंतर मुंबई पोलिसांचीही भेट घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे सीबीआयच्या टीमनेही तपास कामाला सुरुवात केली आहे. सीबीआयने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापन केली होती. उद्या येणाऱ्या सीबीआय एसआयटीच्या टीममध्ये दोन एसपी आणि एका तपास अधिकाऱ्याचा समावेश आहे. . यावेळी मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सुशांतप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीबीआय मुंबई पोलिसांकडून सुशांतप्रकरणाची केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालही घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबई पोलिसांनी तपास केलेला नसून केवळ चौकशी केली आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. या पुढे या प्रकणात कोणताही एफआयआर दाखल झाल्यास तो सीबीआयच पाहण्याचे काम करेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणार आहे.