भुसावळ प्रतिनिधी । सीईटी परीक्षा 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी 2020 – 2021 च्या ऑनलाईन सीईटी परीक्षांकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या मुदतवाढीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या आधी अर्ज सादर केले आहेत, ते उमेदवार नवीन अर्ज भरू शकणार आहेत. या मुदतवाढीमध्ये आधीच्या माहितीमध्ये बदल करण्याची किंवा केंद्र बदलण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध असणार नाही असेही सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. तंत्र शिक्षण विभागाच्या 4 अभ्यासक्रमासाठी आणि उच्च शिक्षण विभागाच्या 8 अभ्यासक्रमांसाठी ही संधी उपलब्ध आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम राज्य सामायिक प्रवेश परीक्षा, सीईटी परीक्षा घेण्यात येतात. भुसावळ परिसरातील विद्यार्थ्यांना श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात समुपदेशन करण्यात येईल या दरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी दिली .
या मुदतवाढीने विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे नुकसान टळणार आहे. विद्यार्थ्यांनी www.mahacet.org या संकेतस्थळावर भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे (9665704444) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.