जळगाव प्रतिनिधी | सीईटी परीक्षांचे वेळापत्रक २१ सप्टेंबरला जाहीर केले होते; परंतु काही विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांच्या तारखा लक्षात घेता सीईटीच्या वेळापत्रकांत दुरुस्तीची मागणी झाल्याने पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता १० ऑक्टोबरपासून सीईटी परीक्षांना सुरुवात होणार आहे.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील कामगिरीच्या आधारे पुढील प्रक्रिया राबवली जाते; परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सीईटी परीक्षांचे वेळापत्रक ठप्प झाले होते. आधीच शैक्षणिक वर्षाला विलंब होत असताना, तसेच जेईई मेन्स, नीट सारख्या परीक्षा घेतल्या गेल्यानंतर सीईटी सेलमार्फत राज्यस्तरीय सीईटी परीक्षांचेही वेळापत्रक जारी केले होते; परंतु या वेळापत्रकातील तारखा अन्य काही विद्यापीठांच्या परीक्षांसोबत येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे केली होती. त्यानुसार पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक सीईटी सेलने जारी केले. प्रवेशपत्र व परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयांसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट देत राहावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे.
असे आहे वेळापत्रक
१० ऑक्टोबर : बीएचएमसीटी सीईटी, ११ ऑक्टोबर : एमएएच-एलएलबी (५ वर्ष) सीईटी, १८ ऑक्टोबर : बीए, बीएस्सी, बीएड (इंटिग्रेटेड), २१ ते २३ ऑक्टोबर – बीएड, अँड बीएड (एलसीटी) सीईटी, २७ ऑक्टोबर : बीएड, एमएड. इंटिग्रेटेड सीईटी, एम.आर्क सीईटी, एमएचएमसीटी सीईटी, २८ ऑक्टोबर : एमसीए सीईटी, २९ ऑक्टोबर : एमपीएड सीईटी, ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर : एमपीएड फिल्ड टेस्ट, २ व ३ नोव्हेंबर : एलएलबी (३ वर्ष) सीईटी, ४ नोव्हेंबर : बीपीएड सीईटी, ५ ते ८ नोव्हेंबर : बीपीएड फिल्ड टेस्ट, ५ नोव्हेंबर : एमएड सीईटी.