मुंबई प्रतिनिधी । सासू-सासर्याने टोमणे मारणे हा विवाहितेचे छळ होऊ शकत नसल्याचा महत्वाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्त्या ३० वर्षीय महिलेने दुबईत स्थायिक झालेल्या वर्गमित्राशी २०१८ मध्ये लग्न केले. लग्नाच्या काही दिवस आधी रजिस्ट्रेशनच्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली जात होती त्यावेळी पतीला त्याच्या आई-वडिलांनी मोलकरणीकडून दत्तक घेतल्याचे कळले, असे महिलेने न्यायालयाला सांगितले. यामुळे ती पती पासून विभक्त झाली. यातच तिचे सासू-सासरे हे टोमणे मारत असल्याच्या कारणावरून तिने न्यायालयात धाव घेतली होती.
यावर झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने सूनबाईंचे चांगलेच कान टोचले. सासू-सास़र्यांचे टोमणे हा काही छळ नाही, संसारात हे चालायचेच, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने सुनावणीवेळी नोंदवले. यामुळे संबंधीत महिलेचे ८० वर्षीय सासरे आणि ७५ वर्षीय सासूला अटकपूर्व जामीन मंजूर केला.