नवी दिल्ली । भारतात आता कोरोनाचा संसर्ग तिसर्या टप्प्यात आला असून काही ठिकाणी समूह संसर्ग आढळून येत असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे. तथापि, जनतेने न घाबरता घरात थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. यानुसार भारतात आता कोरोनाच्या संसर्गाने तिसर्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. यात काही ठिकाणी स्थानिक सामूहिक संसर्ग समोर आलेले आहेत. देशात सध्या एक हजारपेक्षा जास्त पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आलेले आहेत. गत २४ तासांमध्ये कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झालेला आहे. तथापि, अन्य आधुनिक देशांच्या तुलतेन संसर्गाचे प्रमाण हे कमी असल्याचे दिसून येत आहे. ११५ सरकारी आणि ४७ खासगी लॅब्जमध्ये कोरोनाच्या चाचणीची व्यवस्था उपलब्ध असल्याची माहितीदेखील देण्यात आलेली आहे.
दरम्यान, भारतात काही ठिकाणी सामूहिक संसर्ग आढळून येत असला तरी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ चाचणी करून उपचार करावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेने लॉकडाऊनच्या कालावधीत घरीच बसून राहणे आवश्यक असल्याची माहितीदेखील या पत्रकार परिषदेत देण्यात आली.