सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । सावदा शहरात आज एकाच दिवशी चार कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. हे चारही रूग्ण दोन मृत कोरोना बाधीतांच्या कुटुंबातील आहेत.
सावदा येथे दररोज कोरोना बाधीत आढळून येत आहेत. यात आज एकाच दिवशी चार रूग्ण आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे. यात शारदा चौकातील तीन तर गांधी चौकातील एकाचा समावेश आहे. शारदा चौकातील कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या घरातील तिघे आज बाधीत असल्याचे दिसून आले आहे. तर गांधी चौक परिसरात मृत झालेल्या व्यक्तीच्या सात वर्षाच्या नातीला कोरोनाची बाधा झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे व मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे. शहरातील चार रूग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर तातडीने त्या रूग्णांचा रहिवास असणारा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून याला सील करण्यात येत आहे. मुख्याधिकारी जोशी आणि त्यांच्या सहकार्यांनी परिसर सील करण्यास प्रारंभ केला असून याला महसूल व पोलीस प्रशासन सहकार्य करत आहे. तर कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी काळजी घेऊन लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.