यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी– यावल तालुक्यातील सावखेडा सीम गावातील प्रमुख मार्गावरील गटारींवर सिमेंटचे ढापे टाकण्यात आलेले नाहीत. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. सावखेडा सीम सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या एकतर्फी व मनमानी दुर्लक्षित कारभारास कंटाळुन ग्रामस्थांकडून भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यावल तालुक्यातील असलेल्या सावखेडा सीम येथील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या तसेच ठीकठिकाणच्या चौकात ग्रामपंचायती समोरील गटारी तयार करण्यात आल्या आहेत. या गटारीवरील ढापे तुटलेले आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी तुटलेल्या ढाप्यामुळे वाहनचालक तसेच नागरिकांची गैरसोय होत असून अनेक अडथळयांना सामोरे जावे लागत आहे.
तुटलेल्या ढाप्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायत सदस्य वा प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याकडे ग्रामपंचायत पुर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील ग्रामस्थानकडून केला जात आहे. या समस्येच्या निराकरणासाठी आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षितपणाचा निषेध म्हणून गटारीवरील धाप्याचे बांधकाम करण्यासाठी ग्रामस्थांतर्फे भीक मागून ढापा बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार अब्दुल तडवी, दिनेश पाटील, सलीम तडवी, साकीर तडवी, सुनील भालेराव, नागो साळवे, अमिन तडवी यांचेसह युवकांसह अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवत भिक मागून बांधण्यात येणार आहे. मात्र असे असतांना सावखेडा सीम ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जात आहेत, असा आरोप सावखेडा सीमच्या ग्रामस्थांकडून केला जात असून सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या अशा प्रकारच्या एकतर्फी व मनमानी कारभारावर ग्रामस्थांकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे.