सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

पालघर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | पालघर-चारोटी परिसरातील सूर्या नदीवरील पुलावर झालेल्या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन झाले आहे.

 

पालघर – चारोटी परिसरातील सूर्या नदीवरील पुलावर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याचं समजत आहे.  अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिस्त्री हे २०१३  साली वयाच्या ४३ व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर २०१६ साली उद्भवलेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.  टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आणि टाटा समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्याकडून गैरव्यवस्थापन आणि दुराचार झाल्याचा त्यांनी याचिकेत केलेल्या आरोपातही तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं होतं. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती.

न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला.

सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे, असं सांगून न्यायाधिकरणाने एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली होती. तथापि, टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवडय़ांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. त्यानुसार टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णय़ाला आव्हान देण्यात आलं होतं.

 

Protected Content