जळगाव प्रतिनिधी । ओएलएक्सच्या माध्यमातून सायकल विक्री करण्याच्या नादात २१ वर्षीय तरूणाची २८ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सूरज महेंद्र पाटील वय 21 रा भूषण कॉलनी हा कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्याचे वडील हे पतपेढीत नोकरीला आहे. सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची असल्याने त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्स या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली. जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने माझे ठाणे, मुंबईला दुकाने आहेत, याप्रमाणे गप्पा मारत सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले.
सूरजने गुगलपेच्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करताच गुगलपेच्या माध्यमातून त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्यातासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा 11 हजार याप्रमाणे एकुण 28 हजार रुपये काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. सदरचे पैसे हे सपना राणी नामक महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचेही सुरजला गुगलपेच्या माध्यमातून दिसून आले. पैसे परत करण्याच्या बहाण्याने सूरजला संबंधितांचे फोन येत आहेत. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरजने त्याच्या मित्रासह तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरु होते.