सामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरा ; मुख्यमंत्र्यांचं डॉक्टरांना आवाहन

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या मुकाबल्यासाठी व सामान्यांसाठी ‘माझा डॉक्टर’ म्हणून मैदानात उतरा  असं आवाहन राज्यातल्या डॉक्टरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे 

 

आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतल्या ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांना कोरोनाबाबतीतल्या वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन केलं त्यांच्या अनेक शंकांचं निरसन केलं. आत्तापर्यंत मुंबईतल्या एक हजार डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाचं वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे. अशाच रितीने राज्यातल्या इतर विभागातल्या डॉक्टरांशीही संवाद साधण्यात येणार आहे.

 

या उपक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्र करत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका महत्त्वाची आहे कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे.

 

घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होते असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांनी या डॉक्टरांना आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांमध्येही सेवा बजावण्याचं आवाहन केलं.

आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ काळासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात ठेऊन राज्यात बालरोग तज्‍ज्ञांचा एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे याविषयी यावेळी माहिती देण्यात आली  लहान मुलांच्या वर्तणुकीतील बदल, त्यांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दुध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असंही सांगण्यात आलं.

Protected Content