पाचोरा, प्रतिनिधी । कोरोना महामारीत अनेक व्यवसायांवर बंधने होती नंतर अनलॉक कालावधीत विविध व्यवसायांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे, त्यानुसार पाचोरा टेन्ट डेकोरेशन अॅण्ड केटरर्स असोसिएशनतर्फे सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी आ. किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, कोरोना महामारीत राज्यातील मंडप असोसिएशन, डिलर्स वेल्फेअर आॅर्गनायझेशन व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्यामुळे टेन्ट, मंडप, हाॅल, कॅटरींग, डेकोरेशन, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफर, लग्न पत्रिका छपाई, प्रिंटींग प्रेस या सारख्या सेवा देणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले आहेत शासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावे या मागणीसाठी पाचोरा टेन्ट डेकोरेशन अॅण्ड केटरर्स असोसिएशनने आमदार किशोर पाटील यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र परदेशी, उपाध्यक्ष प्रविण पाटील, सचिव सदाशिव पाटील, कोषाध्यक्ष योगेश लोहाय, सदस्य संतोष गौड, गोरख पाटील, प्रमोद तांबटकर, गोविंद लोहार सह पदाधिकारी उपस्थित होते. भारत सरकारने ५० लोकांच्या उपस्थितीत हाॅटेल, बॅंक्वेट हाॅल, मंडप, फार्म हाऊस, टेन्ट हाऊस इत्यादी ठिकाणी लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. परंतु एवढ्या कमी उपस्थितीत कार्यक्रम करण्यास आयोजक सहमत नाही. तसेच या व्यवसायात एवढ्या कमी उपस्थितीत कार्यक्रम केल्यास त्याचा खर्चही निघत नाही यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिक व त्यांचे कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या अडचणीस सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने आमचा योग्य विचार करुन समारंभात व इतर कार्यक्रमातही किमान ५०० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी द्यावी असेही निवेदनात नमूद केले आहे.