सातारा: वृत्तसंस्था । महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झालेला असतानाच साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि प्रशासनाने मदतकार्य सुरू केलं आहे.
एकीकडे रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना, तिकडे साताऱ्यातही भीषण दुर्घटना घडली. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.
चार दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. आतापर्यंत आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. एकूण 15 घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं