यावल (प्रतिनिधी ) । तालुक्यातील दहीगाव येथून जवळ असलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरण ओव्हर फ्लो झाल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
निसर्गरम्य वातावरणात विस्तारलेल्या अशा या निंबादेवी धरणाची खोली २२ मीटरची आहे. या धरणाची साठवन क्षमता दोन पॉईंट ५० घनमीटर इतकी आहे. या धरणाचा फायदा या क्षेत्रातील सुमारे ८००एकर जमिनीला पाण्याच्या विसर्गाचा फायदा होणार आहे.
दरम्यान मागील २ वर्षापुर्वी या धरणाला भगदड पडल्याने परिसरातील शेतकरी बांधव हे चांगलेच अडचणीत आले होते. तथापी या संदर्भात शेतकऱ्यांनी धरण दुरूस्तीच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने जवळपास १ कोटी रुपये खर्च करून या धरणाची दुरुस्ती करण्यात आली होती.
या धरणाचे काम पूर्ण झाले असून पाणीवापर संस्थेमार्फत या पाण्याचे वितरण केले जाईल साडेसात किलोमीटर लांबीची पाइपलाइन शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. सावखेडा सिम शिवारातील सर्व शेतजमिनीला याचा मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती अभियंता एन.टी.आढे यांनी दिली आहे.
धरणाचा ओव्हरफ्लो काढण्यासाठी आकर्षक अशा पायऱ्या तयार करण्यात आलेले आहे. या पायर्यांवरुन झालेले पाणी वहात असल्याने एक प्रकारे याठिकाणी आकर्षक असे सुंदर वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. धरण क्षेत्राच्या आजूबाजूचा परिसर हरियालीने माखलेला असल्याने याकडे प्रेक्षकांची व पर्यटन प्रेमींची ओढ निर्माण झालेली आहे.
मध्यप्रदेशासह जळगाव जिल्ह्यातील लांब लांब अंतरावरून पर्यटक हे विलोभनिय दृष्य बघण्यासाठी येथे येत असतात व या पर्यटन क्षेत्राचा आनंद घेत असतात, मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेतांना प्रशासकीय पातळीवर दक्षता घेण्यात येत असल्यामुळे येथे दर्शनार्थी पर्यटकांची गर्दी होऊ नये, याची खबरदारी घेणे देखील अत्यंत गरजेचे असतांना मात्र संबंधिताकडून तशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसुन येत आहे.