पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती लेकी व सुनेच्या नावाने वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समिती प्रत्येकवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करत असतात. सालाबादप्रमाणे यावर्षी गावात चौकाचौकात लेकीच्या आणि सुनेच्या नावाने वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. गावात ३५० वेगवेगळ्या वृक्षांची रोपे आणून चौकाचौकात, बाजारपेठ, स्मशानभूमी, मुख्य रस्त्याने झाडे लावण्यात आली. तसेच यावेळी लग्न झालेल्या लेकीच्या नावाने झाड लावून तिच्या वडिलांनी त्या वृक्षाचे संगोपन करावे तसेच जी मुलगी गावात सुनबाई म्हणून येईल तिच्याही नावे तिच्या दारी अंगणात झाड लावून गावात मुलगी आल्याचेही समाधान होईल अशा अनोखी संकल्पना शिवजयंती उत्सव समितीने राबवली आहे.
जेष्ठ नागरिक तसेच इतरांनाही बसण्यासाठी गावातील काही व्यक्तींनी देणगी रुपाने सिमेंटचे बाक शिवजयंती उत्सव समितीला भेट दिल्याचेही पहावयास मिळाले. पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांनी पाच, शंकर बाजीराव पवार यांनी दोन, सुभाष पाटील त्यांनी दोन, गजानन पाटील यांनी एक, सतीश बाजीराव पाटील यांनी एक, कैलास मराठे यांनी एक असे एकूण बारा सिमेंटचे बाक ग्रामस्थांना बसण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मिळाले. यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शिवजयंती उत्सव समितीने शिवजयंती साधेपणाने साजरी केली. जेणेकरून आपला गाव कसं सुरक्षित राहील याकडे अधिक लक्ष त्यांनी दिले.