शिर्डी प्रतिनिधी । साईबाबांच्या जन्मभुमीवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. उद्यापासून (दि.१९) शिर्डीत बंद पुकारण्यात आला असून शिर्डी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देत शिर्डी परिसरातील २५ गावांनी ‘बेमुदत शिर्डी बंदला’ जाहीर पाठिंबा दिला आहे. पाथरीच्या विकासाला नव्हे तर पाथरीला साईबाबांची जन्मभूमी म्हणण्याला विरोध असल्याचे शिर्डीकरांनी स्पष्ट केले आहे.
शिर्डीत देश आणि विदेशातून साईबाबांचे भक्त भक्तीभावाने दर्शनासाठी येत असतात. मात्र उद्यापासून भक्तांना साईबाबांचे दर्शन घेता येणार नाही. शिर्डीकरांनी बेमुदत बंद पुकारल्याने भाविकांना आता दर्शनासाठी सबुरी ठेवावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना, साईबाबाचे जन्मस्थळ म्हणून पाथरीच्या विकास आराखड्याचे लवकरच भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा केली. त्या घोषणेनंतर शिर्डीत नाराजी पसरली. साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही जन्मस्थानाविषयी दावे केले जातात. हे सर्व प्रकार निंदणीय असल्याचे शिर्डीतल्या नागरिकांनी सांगितले. साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला.