जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहूनगरातील सहयोग क्रिटीकल केअरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला तेथील डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तसेच संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी सहयोग क्रिटीकलमध्ये तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी डॉक्टरांनाही मारहाणीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी शहर पोलिसात पारोळा तालुक्यातील विटनेर येथील चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील विटनेर येथील विनोद भिमराव वानखेडे यांचा बुधवारी रात्री चिंचपुरा गावाजवळ अपघात झाला होता. अपघातानंतर उपचारासाठी कुटुंबियांसह नातेवाईकांनी वानखेडे यांना जळगावातील शाहू नगरातील सहयोग क्रिटीकल केअर रुग्णालयात दाखल केले. डॉ. विनोद किनगे, डॉ. प्रकाश सुरवाडे यांनी वानखेडे यांच्यावर उपचार केले.
काही वेळाने तपासणीत रुग्ण वानखेडे यांची नाडी तसेच ब्लश प्रेशरही होत नसल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी वानखेडे यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. याठिकाणी वानखेडे यांचा मृत्यू झाला. याचदरम्यान रुग्णालयात घेवून जात असतांना माघारी येवून काही जणांनी सहयोग क्रिटीकल केअरच्या डॉक्टरांवर संताप व्यक्त केला. याचवेळी वानखेडे यांच्या मृत्यूचा निरोप आल्यावर नातेवाईकांच्या संतापात आणखीनच भर पडली. संतापात नातेवाईकांनी सहयोग क्रिटीकल केअरमधील आयसीयु कक्षात जावून काचांसह इतर वस्तूंची तोडफोड केली तसेच डॉ विनोद किनगे यांना मारहाणा करण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील कर्मचार्यांनी त्यांची सुटका केली. नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास डॉ.विनोद किनगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चार ते पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे