चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतीच मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यात सर्व व्यवसायांना सुट देत फक्त सलून व्यवसाय बंद पाळण्याचे आदेश दिलेले असल्याने सलून दुकान पुर्ववत सुरू करावी अशी मागणी नाभिक संघाने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने नुकतीच मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र या मिनी लॉकडाऊनमध्ये इतर व्यवसायांना सुट देण्यात आली असून फक्त सलून व्यवसायांवर कडक निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे हे निर्बंध हटवून सलून दुकान पुर्ववत करा अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा संत सेना महाराज नाभिक संघाने निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण व माजी आ. राजीव देशमुख यांच्याकडे केली आहे. आधीच गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत अडचणीत सापडलेला नाभिक समाज आता पुन्हा या मिनी लॉकडाऊनमुळे त्याचे जगणे कठीण होऊन गेले आहेत. या निवेदनात नुकतीच चोपडा येथील गणेश शैंदाणे यांनी दि. ७ एप्रिल रोजी लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने त्वरित दहा लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. त्याचबरोबर सलून व्यावसायीकांना त्वरीत कोरोनावरील लस द्यावी व कोरोनाच्या काळात आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण झाल्या नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाभिक संघाने दिला आहे.