नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ३२ हजार ७३० रुग्णांची नोंद झाली आहे.देशात दैनंदिन रुग्णवाढीचा नवा जागतिक उच्चांक नोंदवण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशात २ हजार २६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९२० रुग्णाना जीव गमवावा लागला आहे. भारत सध्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून रुग्णसंख्या वाढीत भारताचा वेग सर्वाधिक आहे. ही बाब चिंताजनक असून यामुळे वैद्यकीय सेवांवर आणि आरोग्य सुविधांवरील ताण वाढत आहे. काही आठवड्यांपासून भारतात रुग्णसंख्येचा दर वाढत असून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
दरम्यान देशात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
बुधवारी देशात ३ लाख १४ हजार ८३५ रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली होती. रुग्णसंख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. मात्र शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ही ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून असून नव्या उच्चांकाची नोंद झाली. दिल्लीत एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून बुधवारी २६ हजार नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ३०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकूण होणाऱ्या रुग्ण संख्या वाढीत ७५ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या १० राज्यांमधील असल्याचं आरोग्य विभागाने नोंदवलं आहे. आतापर्यंत १३ कोटी ५३ हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.