सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- अजित पवार

मुंबई-खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेमागचे सत्य बाहेर येण्यासाठी या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे राज्यपाल रमेश बैस यांना करण्यात आली आहे.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा दि.16 एप्रिल, 2023 रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.   या कार्यक्रमादरम्यान 14 निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला.  सुरुवातीला उष्माघातामुळे 14 अनुयायांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.  परंतु, नंतरच्या काळात समाज माध्यम, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांकडून वेगवेगळी माहिती उघडकीस येत आहे.

 

या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला, उपस्थित अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती, अनुयायी 7 तास पाण्याशिवाय व खाण्याशिवाय उन्हात होते व त्यामुळे अनेकांना त्रास झाला, गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचण्यात अक्षम्य विलंब झाल्यामुळे वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर उन्हात कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव नव्हता, जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झाला, अशा अनेक बाबी टप्प्याटप्प्याने उघडकीस येत आहेत.  या सर्व बाबींची शहानिशा करुन त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 

हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे तो शासनाने आयोजित केला होता.  या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.  राज्यातील मागील काही दिवसातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आहे. उष्णतेची प्रंचड मोठी लाट राज्यात आलेली आहे. त्यामुळे एवढा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती.  तथापि, ती न झाल्यामुळे 14 अनुयांयाचा नाहक बळी गेला. ही दुर्देवी घटना नैसर्गिक नसून शासननिर्मित आहे, सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला आणि मूत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. त्यामुळेच तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कार्यक्रम आयोजनाबाबत घेतलेला निर्णय, आयोजनातील त्रुटी आणि ही दुर्देवी घटना याची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी,  जखमी अनुयांयावर मोफत उपचार करुन त्यांना प्रत्येकी रु.5 लाख रुपयांची मदत करावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशा मागण्या मी माझ्या दि.17 एप्रिल, 2023 रोजीच्या पत्रान्वये सरकारकडे केल्या आहेत. तथापि, एकाही मागणीबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. सरकारचे प्रमुख म्हणून या मागण्या मान्य करण्याबाबत आपण सरकारला निदेश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रात केली आहे.

Protected Content