समृध्‍द, बलशाली भारत निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्णअर्थसंकल्प : माजी मंत्री खडसे

 

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वात भारत सरकारच्‍या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्‍प समृध्‍द, बलशाली भारत निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने अतिशय महत्‍वपूर्ण आहे, व या अर्थसंकल्पात शेतकरी व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा केंद्रसरकारने दिला आहे अशी प्रतिक्रिया राज्‍याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

राज्‍याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, शेतीच्‍या उत्‍पन्‍नात २०२२ पर्यंत दुपटीने वाढ करणे, शेतकऱ्यांसाठी व शेती उत्पादन दुप्पट करण्यासाठी १६ सुत्री कार्यक्रम, केळीला व अन्य फळ भाजीपाला वहातुकीसाठी आता रेल्वेतर्फे नियमीत वॅगन मिळतील. फळ भाजीपाला साठवण्यासाठी ठिकठिकाणी नविन शितगृहे निर्मीती, शेतीसाठी वाढीव सोलर कृषी पंपासाठी तरतूद, शेतकऱ्यांच्या माल साठवण्यासाठी नविन वेअर हाऊस बनवणे, २०२४ पर्यंत प्रत्‍येकाला नळाचे पाणी देणे, शेतक-यांसाठी १५ लक्ष कोटी रू. शेती कर्जासाठी ठेवणे. प्रत्‍येक जिल्‍हयासाठी एक्‍सपोर्ट हब निर्माण करणे, शिक्षण क्षेत्रासाठी ९९ हजार ३०० कोटी रूपयांची तरतूद करणे, ११२ जिल्‍हयांमध्‍ये आयुष्‍यमान भारत योजनेचा लाभ व्‍हावा यादृष्‍टीने हॉस्‍पीटल्‍स तयार करण्‍यासाठी योजना आखणे, सर्वसामान्यांना आयकरामध्‍ये मोठी सुट देणे, नवनविन रोजगार निर्मीती व्हावी म्हणून विविध उपक्रमांसाठी भरीव तरतूद हे या अर्थसंकल्‍पाचे वैशिष्‍टय आहे. संस्‍कृती संवर्धनासाठी डिम्‍ड युनिवर्सिटी स्‍थापन करणे, पर्यटनाला चालना देण्‍यासाठी मोठी आर्थीक तरतूद करणे यासह सर्वच घटकांना न्‍याय देण्‍याची भूमीका या अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन अर्थमंत्र्यांनी घेतली आहे. जागतिक  मंदीच्‍या काळात सुध्‍दा या मंदीच्‍या सावटापासून आपल्‍या देशाला दूर ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रगतीची कास धरणारा उत्‍तम अर्थसंकल्‍प या देशातील जनतेला व शेतकऱ्यांना दिलासा दिल्‍याबददल माजी मंत्री खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे विशेष अभिनंदन केले आहे. अर्थसंकल्प जरी तुटीचा असला तरी देशांतील सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांच्या हिताचा हा अर्थसंकल्प असल्याने हा अर्थसंकल्प निश्चीतच चांगला व स्वागतार्ह्य आहे असे माजी मंत्री खडसेंनी प्रतिक्रियेत म्‍हटले आहे.

Protected Content