समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत हायकोर्टात होणार सुनावणी

मुंबई प्रतिनिधी | एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा नेमका कोणता धर्म आहे ? याबाबत उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे.

अल्पसंख्याक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल शंका उपस्थित केली होती. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी वानखेडेंचे जात प्रमाणपत्रं आणि निकाहनाम्याची कॉपीही दिली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं होते. या संदर्भात आता मुंबई महापालिकेने महत्वाची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली आहेत.

याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनाही ही कागदपत्र दिली जाणार आहे. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महापालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. यामुळे आता न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content