फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्व संप्रदाय व परंपरेचे संत एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याच्या उद्देशाने खानदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात फैजपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय वैदिक धर्म संमेलनाच्या भव्य दिव्य आयोजनानंतर पुन्हा दहा वर्षांनी फैजपूर येथील श्री सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ रोजी समरसता महाकुंभचे आयोजन केले आहे.
येथील सतपंथाच्या गुरुशिष्य परंपरेला ४२५ वर्षे पूर्ण (चतु:शताब्दी रौप्य महोत्सव) होत आहे तसेच पूज्य गुरुदेव ब्र. जगन्नाथ महाराजांची २१ वी पुण्यतिथी, पूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज साधू दिक्षाची ( दिक्षा संस्कार) २५ वर्षे पूर्ण आणि २०११ मध्ये फैजपूर येथे अखिल भारतीय वैदिक धर्म संमेलनाला व प.पू. जनार्दन हरी जी महाराज यांच्या ‘महामंडलेश्वर’ पट्टाभिषेक सोहळ्याला १० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने बांधलेले वढोदा ता. यावल, येथील श्री निश्कलंक धाम मधील तुलसी निसर्गोपचार पंचकर्म रुग्णालयाचे उद्घाटन, श्री जगन्नाथ गोशाळा स्थलांतरित जागेचे भूमिपूजन व सनातन धर्मातील सर्व संप्रदाय व परंपरेतील सर्व धर्माचार्यांचे संमेलन ‘समरसता महाकुंभाचे’ नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन श्री निष्कलंक धाम, वढोदा येथे १३ नोव्हेंबर २२ रोजी करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्व तपशिलांसह विविध समित्यांचे गठन करून नियोजन करण्यात येणार आहे.
“समरसता महाकुंभ २०२२” या भव्य दिव्य मेळाव्यात सुमारे चारशे ते साडेचारशे संत महात्म्यांच्या उपस्थितीसह भारतासह विविध देशातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहे. यावर्षी ब्र. गुरुदेव जगन्नाथ महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव २९ डिसेंबर २२ रोजीच साजरा होणार आहे असे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सतपंथ मंदिर संस्थान मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.