फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभात तुलसी हेल्थ केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
शरीर व मनाच्या शुद्धीसाठी भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्व दिले आहे. या आयुर्वेदिक उपचार पद्धतीत पंचकर्म चिकित्सा यांचे वर्णन आले आहे. पंचकर्म हा शब्द पाच व क्रिया या दोन शब्दांनी तयार झाला आहे. पंचकर्म ही पाच चरणांची प्रक्रिया आहे. दूषित वातावरण आणि चुकीची खाद्य संस्कृती यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा शरीरात विषारी वायू किंवा अन्य समस्या निर्माण होतात. या समस्या पंचकर्माच्या माध्यमातून दूर केल्या जातात. यामुळे शरीर निरोगी राखण्यासाठी नैसर्गिक शारीरिक क्षमता पुन्हा संचयित करण्यास मदत होते. यात वमन, विरेचन, नस्यम, अनुवासन आणि अस्थापन अशा पाच क्रियांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीचे वय, प्रकृती, पाचनक्षमता व दोषांमधील बिघाड असंतुलन यांचा विचार करून सायकतीची गरज लक्षात घेऊन व्यक्तीसापेक्ष उपचार करण्याचे काम आयुर्वेदिक पंच चिकित्सेच्या माध्यमातून केले जाते. अशाच प्रकारचे पंचकर्म चिकित्सा आयुर्वेदिक उपचार करण्याचे काम तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून करण्यात येणार असून या सेंटरचा लोकार्पण समारंभ विशेष समरसता महाकुंभात करण्यात येणार आहे. सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या समरसता महाकुंभात तुलसी हेल्थ केअर सेंटरचा लोकार्पण समारंभ संतमहंतांच्या उपस्थितीत होणार आहे.