समरसता महाकुंभाचे निष्कलंक धाम येथे उद्या भूमिपूजन व ध्वजारोहण 

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | संपूर्ण खानदेशाचे आकर्षण ठरत असलेल्या वढोदे येथील निष्कलंक धाम परिसरात दिनांक २९,३०,३१ डिसेंबर रोजी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार आयोजित समरसता महाकुंभ तयारीला आता वेग आलेला असून दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता निष्कलंक धाम येथे समरसता महाकुंभाचे भूमिपूजन व ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

फैजपूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य अशा वढोदे गावालगत श्री निष्कलंक धाम येथे समरसता महाकुंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सतपंथ मंदिर संस्थान चतु:शताब्दी रौप्य महोत्सव, अखिल भारतीय संत संमेलन दशाब्दी महोत्सव, प.पू. ब्र. गुरुदेव जगन्नाथ जी महाराज यांची २१ वी पुण्यतिथी, महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा साधू दीक्षा रौप्य महोत्सव, श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभीषेक दशाब्दी महोत्सव तसेच निसर्गोपचार तुलसी हेल्थ केअर सेंटर, व श्री जगन्नाथ गौशाला हे विविध उपक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रम अंतर्गत आयोजित समरसता महाकुंभास भारतासह जगभरातून जगतगुरु, धर्माचार्य, संत, महापुरुष यांसह लाखो भाविक भक्तगणांची उपस्थीती लाभणार आहे.

सतपंथ रत्न महामंडलेश्वर जर्नादन हरीजी महाराज यांनी सांप्रदायिक, सामाजिक समरसता निर्माण व्हावी, वेगवेगळ्या जाती-धर्माच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र यावे या उद्देश्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या समरसता महोत्सवास जगभरातील विविध देशांसह महाराष्ट्र, मध्यप्रदॆश, गुजरात, उत्तरप्रदॆश, पंजाब या राज्यातून जगद्गुरु, धर्माचार्य, संत, महापुरूष यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती लाभणार आहे. लाखो भाविक भक्तगणांना संतदर्शन व ऐतिहासिक धर्म सभा याचा लाभ संताच्या साक्षीने होईल.

समरसता महाकुंभाला  नियोजनपूर्वक तयारीला वेग आला आहे.  दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत निष्कलंक धाम वढोदे या ठिकाणी होणाऱ्या समरसता महाकुंभाचे आयोजन महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार  आहे. देशातील विविध संप्रदायात असलेला भेदाभेद मिटून त्यांच्यात समरसता व एकात्मता निर्माण व्हावी हा उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या समरसता महा कुंभास देशभरातील विविध संप्रदायातील सुमारे ४०० संत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. त्यासाठीची जय्यत तयारी निष्कलंक धाम येथे सुरू आहे. तीन दिवसीय समरसता महाकुंभासाठी विविध राज्यातून व महाराष्ट्रभरातून येणाऱ्या सुमारे सात हजार भाविकांची निवास व्यवस्था परिसरात करण्यात आलेली असून उपस्थित राहणाऱ्या संतांची व्यवस्था निष्कलंक धाम येथेच करण्याचे नियोजन केले आहे. सहा एकर क्षेत्रात सभामंडपाची उभारणी करण्यात येणार असून ४० फूट बाय ८२ फूट या आकाराचे भव्य व्यासपीठ साकारले जाणार आहे. कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी विविध ३५ समित्यांचे गठन करण्यात आलेले असून त्यात मुख्य आयोजन समितीसह भोजन समिती, निवास व्यवस्था समिती, पार्किंग व्यवस्था समिती, व्यासपीठ समिती, पाणीपुरवठा समिती, वीजपुरवठा समिती, स्वच्छता समिती अशा विविध समित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.  संत आणि भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आलेली असून त्यासाठी सहा एकर क्षेत्रात भोजन कक्षाची उभारणी होणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. गावोगावावरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठीची भव्य अशी १५ एकर क्षेत्रात पार्किंग व्यवस्था मुख्य कार्यक्रमापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी केलेली असून त्यासाठीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतंत्र पार्किंग समितीकडे  सोपवलेली आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी तीन हजार ते साडेतीन हजार स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने नाव नोंदणी केलेली सर्व सेवा देत आहे. देशभरातील विविध संप्रदायातील संत एकाच व्यासपीठावर येणार असून त्यांच्या दर्शनाचा आणि आशीर्वचनांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन जनार्दन हरीजी महाराज व आयोजन समितीने केले आहे.

सभामंडप, पार्किंग व्यवस्था, भोजन व्यवस्था यासाठी वापरण्यात येणार असलेल्या शेतजमिनींमध्ये रब्बी हंगामात येणाऱ्या पिकांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फटका बसणार नाही याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे दिसून येते. निष्कलंकधाम वढोदे येथे होणाऱ्या या महाकुंभामुळे परिसरात अत्यंत उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. परिसरात या भव्यदिव्य महाकुंभाची चर्चा आहे. अनेक जण या महाकुंभासाठी आतुरलेले असून भक्तिमय वातावरण परिसरात निर्माण झालेले आहे. अनेक स्वयंसेवक महाकुंभ यशस्वी होण्यासाठी स्वयंस्फू्तीने अहोरात्र झटत आहे. अथक व अपार कष्ट करूनही त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाचा माग मुसई दिसत नाही. ही परमेश्वराचीच कृपा असावी असे स्वयंसेवक बोलून दाखवत आहे. दिनांक १५ रोजी सकाळी दहा वाजता सर्व संप्रदायाचे संत महंत तसेच सर्व जाती धर्मातील एकेका व्यक्तींच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण, संवाद हा कार्यक्रम होणार आहे.

Protected Content