सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे पाच पुस्तकांचा एकमेवाद्वितीय प्रकाशन(व्हिडिओ) सोहळा

जळगाव, प्रतिनिधी |  कविता फुंकर आहे, ते संचित आहे, काळजाच्या बेरजेतून क्रांतीची मूल्ये रुजविणारा हा सोहळा आहे. दुःखाच्या, निराशेच्या अन्यायाविरोधात बारुद भरण्यासाठी लिहिले गेले पाहिजे. लेखकाने व्यक्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

 

ते अथर्व पब्लिकेशननिर्मित ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा चिंतनाचा समुद्र, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल लिखित कथाशील कथासंग्रह, घनश्याम भुते यांचा शब्दवेल कवितासंग्रह, कवी विलास मोरे यांचा उजेडाचं झाड कवितासंग्रह व नभ प्रकाशननिर्मिती राजेंद्र पारे लिखित बुद्धा इज स्माईलिंग कादंबरी या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा प्रसंगी बोलत होते. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते वास्तव जीवनाची उकल करणार्‍या या पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

फाय फाउंडेशन पुरस्कारप्राप्त व ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख, बुलडाणा येथील ज्येष्ठ समीक्षक सुरेश साबळे, बालभारती अभ्यासमंडळाचे माजी सदस्य शेषराव धांडे (वाशिम), महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे,  नगसेवक प्रा. डॉ. सचिन पाटील, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे (पुणे) कार्यकारिणी सदस्य युवराज माळी प्रमुख अतिथी होते.

डॉ. सबनीस म्हणाले की, रंगामध्ये बुडून जाणारी माणसे रंगाची अनुभूती वेगळी जाणतात. त्यासाठी कलावंत, चित्रकार साहित्यिक, विचारवंत आपल्या लेखनीशी, कुंचल्याशी प्रामाणिक असतात. याचे अनेक दाखले साहित्यिक क्षेत्रात आपल्या दृष्टीस पडतील. कादंबरी, कविता, कथा आणि वास्तवाचे साहित्य समाजाला घडवीत असते. समाजाला जागे करीत असते आणि भिडस्तपणे प्रस्थापित व्यवस्थेला उद्ध्वस्त करीत असते. म्हणून लेखकाने व्यक्त होणे, लिहिणे आज काळाची गरज आहे.

याप्रसंगी प्रकाशित पुस्तकांचे लेखक प्रा. डॉ. केशव देशमुख, डॉ. मिलिंद बागूल, घनश्याम भुते, राजेंद्र पारे, कवी विलास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी जीवनाचा पट उलगडून दाखविला. सध्याच्या करोना काळात जीवन जगण्याची बदललेली शैली, तळागाळातील समाजांतील वास्तव जीवनाची उकल, तसेच शेतकरी, शेतमजूर व कष्टकर्‍यांच्या जीवनातील वास्तव व्यथा या पुस्तकांतून मांडण्यात आल्याचे लेखकांनी मनोगतात सांगितले. बापूराव पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. बापू शिरसाठ यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी, प्रा. डॉ. के. के. अहिरे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, डॉ. के. के. मोरे, राहुल निकम, सुनील सोनवणे, शिवराम शिरसाठ, जयसिंग वाघ, विजयकुमार मौर्य, अ. फ. भालेराव, दिलीप सपकाळे, अनिल सुरळकर, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, भय्यासाहेब देवरे, सुनील जाधव, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील महाजन, सगीर शेख, सुनील पाटील, गिरीश चौगावकर, सुमित बागूल, दीपक साळुंखे आदींनी सहकार्य केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1115839695616888

 

Protected Content