मुंबई (वृत्तसंस्था) छिंदवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी मराहाजांचा पुतळा हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने शिदोरी या मुखपत्रात वीर सावरकर यांचा अपमान केला आहे. हे सगळं शिवसेनेला चालते का? तसेच सत्तेसाठी शिवसेना किती लाचारी पत्करणार आहे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
काँग्रेसने राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे. मध्य प्रदेशमधल्या दवाड्यामध्ये आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबणा करण्यात आली. त्याचा भारतातील प्रत्येक व्यक्ती निषेध करतो आहे. छत्रपतींचा हा अपमान भारत देश कधीच सहन करणार नाही. याबाबत मध्य प्रदेश सरकारने माफी मागितली पाहिजे. त्याठिकाणी महाराजांचा पुतळा पूर्ण सन्मानाने उभा केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही फडणवीस म्हणाले आहेत. शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रात वीर सावरकर यांच्याविषयी गलिच्छ लिखाण करण्यात आले आहे. काँग्रेसने महापुरुषांच्या अपमानाची मालिकाच सुरु केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीतही शिवसेना महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत आहे. ही लाचारी शिवसेना किती काळ सहन करणार? असेही फडणवीस म्हणाले.