सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन : अशोक गेहलोत

जयपूर (वृत्तसंस्था) जेव्हा तुम्ही अतिमहत्वकांक्षी होता, तेव्हा तुमचे विचार मागे पडतात. परंतू सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन, अशी भावनिक प्रतिक्रिया राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पायलट आणि त्यांच्या संबंधावर मोकळेपणाने संवाद साधला.

 

 

गेहलोत पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. परंतू राजस्थानात सरकार स्थापन झाल्यापासूनच अर्थात दीड वर्षांपासून पायलट आणि माझ्यात कुठलाही संवाद नव्हता. पायलट यांनी विनाकारण नोटीसीचा मुद्दा बनविला. वास्तविक १० ते १२ आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. भाजपा आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतेय, अशी तक्रार आमच्या पक्षाने एसओजीकडे केली होती. आम्ही कुठेही त्यांचे नाव घेतले नाही. पण तेच स्पष्टीकरण देत होते, असेही गेहलोत म्हणाले. पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्री बनवण्यात आले, मग राजस्थानमध्ये असे का घडले नाही? या प्रश्नावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी ‘तो हायकमांडचा निर्णय होता’ असे उत्तर दिले,असे गेहलोत म्हणाले.

Protected Content