चंडीगड : :वृत्तसंस्था, । सख्ख्या चुलत भावंडांशी (फर्स्ट कझिन) विवाह बेकायदा आहे, असे मत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
लुधियाना जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या १७ वर्षीय चुलत बहिणीबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहात होता. या विरोधात संबंधित युवतीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात १८ ऑगस्टला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या व्यक्तीने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.
संबंधित युवती अल्पवयीन आहे, तसेच दोघांचे वडील सख्खे भाऊ आहेत. असे असतानाही दोघांनी विवाह केल्यामुळे तरुणाला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
‘फर्स्ट कझिन’ संकल्पनेमध्ये सख्खी चुलत आणि सख्खी मावस भावंडे यांचा समावेश होतो. जिवाला धोका असल्याचा दावा करणारी फौजदारी रिट याचिका तरुण आणि तरुणीने एकत्रित दाखल केली आहे, असे आरोपीच्या वकिलांनी सांगितले.
त्यावर सख्ख्या चुलत भावंडांतील विवाह बेकायदा असल्याचे मत न्या. अरविंदसिंग संगवान यांनी व्यक्त केले. पुढील सुनावणी जानेवारीत होणार आहे.