जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या आगामी महासभेत तीन संस्थांना खुला भुखंड देण्याचा प्रस्ताव येणार असून याला राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख यांनी विरोध दर्शविला आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी देशमुख, उपाध्यक्ष मिलिंद सोनवणे, समन्वयक मुविकोराज कोल्हे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, प्रशांत पाटील, युगल जैन यांनी उद्या होणार्या महासभेतील तीन प्रस्तावांना विरोध दर्शविला आहे. हे निवेदन मुख्यमंत्र्यांसह महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.
जळगाव महापालिकेची ऑनलाइन महासभा १२ ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेत २८ प्रस्तावांवर चर्चा होणार असून, यात नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे व स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी सेवाभावी संस्थांना खुला भूखंड देण्याची मागणी केली आहे. यात अॅड. शुचिता हाडा यांनी मुक्ताईनगरातील कॉलेजजवळ अथवा भोईटेनगरातील मनपाची खुली जागा राजपूत समाजाला मिळण्याचा प्रस्ताव दिला आहे. अॅड. दिलीप पोकळे यांनी केशर बाग विकसित करण्यासाठी मिळावी, असा प्रस्ताव दिला आहे. नवनाथ दारकुंडे यांनी बहुउद्देशिय संस्थेला जागा मिळण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दरम्यान, हे तिन्ही प्रस्ताव बेकायदेशीर असल्याचे राष्ट्रवादी अर्बन सेलच्या निवेदनात म्हटले आहे. ले-आऊटमधील खुला भूखंडावर त्या भागातील रहिवाशांचा अधिकार असतो. जागेचा प्लॅन मंजूर करताना दाखवलेली मोकळी जागा ही डेव्हलपमेंट कंट्रोल रूलप्रमाणे मोकळी सोडणे बंधनकारक असते. जागा मोकळी सोडली नाही तर लोकांना श्वास घेण्यासाठी हवा मिळणार नाही असे यात नमूद करण्यात आले आहे.
तर, जळगाव महापालिकेत नगरसचिव पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी, राज्य शासन अथवा स्थानिक संस्थेतील वर्ग २ च्या अधिकारी दर्जा नाही. तसेच ज्यांना कायद्याची जाणीव किंवा माहितीच नाही किंवा नगर सचिव पदाचे शिक्षणच नाही अशा अधिकारी, कर्मचार्याकंडून महासभेत बेकायदेशीर प्रस्ताव येत असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.