नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भारत-चीन सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा आणि राज्यसभेत सरकारची बाजू मांडली. विरोधकांनी सरकारसोबत उभं राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. परंतु विरोधकांकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागण्यात येत आहे. सरकारकडून संपूर्ण माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप करत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर हल्लोबोल केला. संसदेत संरक्षण मंत्र्यांनी कोणतीही माहिती लपवू नये, असंही ते म्हणाले.
“चीननं १ हजार चौरस किलोमीटरपर्यंतच्या भारताच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे. ९०० चौरस किलोमीटर जमीन देपसांगमध्ये आहे. परंतु राजनाथ सिंह यांनी लोकसभेतील आपल्या चर्चेत देपसांगचा उल्लेखही केला नाही. सरकारसाठी हे सोपं असेल. परंतु आता वेळ आली आहे की तुम्ही संसदेत माहिती लपवणं बंद करावं. या ठिकाणी उत्तरं देण्यास तुम्ही बांधील आहात,” असं ओवेसी म्हणाले. यापूर्वीही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलेलं भाषण म्हणजे एक ‘घिनौना मजाक’ आहे असं ओवेसी यांनी म्हटलं होतं.