स्टॉकहोम: वृत्तसंस्था । जगभरात प्रतिष्ठेचा यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होते . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा यांचीही नावे चर्चेत होती.
युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी, परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो.
गुरुवारी अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे.