महाराष्ट्रातील गड कोट म्हणले कि आपल्याला शिवराय आठवितात. एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणार्या या योध्द्याची प्रत्येक मराठी व्यक्तिला कोणत्याही गड कोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे. पण एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत. हा बुलंद किल्ला आहे, श्रुंगारपुरचा पहारेकरी “प्रचितगड”. प्रचितगड, उचितगड, राग्वा अशी काही नावे याला आहेत. भौगोलिक्दृष्टया सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातुन जाणे सोयीचे आहे. कोल्हापुर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी अश्या चारही जिल्ह्यांच्या सीमा जिथे मिळतात तिथे हा भक्कम गड एखाद्या रखवालदारासारखी छाती ताणुन उभा आहे.
पुर्वी या गडावर जायचे म्हणजे अनेक वाटा होत्या. मात्र सध्या चांदोली जंगलाचे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पामधे रुपांतर झाल्याने फक्त श्रुंगारपुरमधूनच खड्या, घसरड्या आणि अतिशय कठीण वाटेने गडावर जाता येते. इतिहासाविषयी बोलायचे तर पाच पातशाह्यानी पुर्ण महाराष्ट्र आपसात वाटुन घेतला असला तरी या अंधारात काही संस्थाने पणतीसारखी स्वताचे अस्तत्व राखुन होती. शृंगारपुरचे सुर्वे त्यापैकी एक. प्रचितगडाच्या भरोश्यावरच ते असे वेगळे अस्तित्व राखु शकले. मलिक उत्तेजारने हि छोटी संस्थाने बुडविण्यासाठी आक्रमण केले तेव्हा याच सुर्वे व विशाळगडकर मोरे यांनी त्याचा पाडाव केला. पुढे आदिलशहाचे शृंगारपुरचे सरदार सुर्वेंच्या ताब्यात १६६१ साली मंडणगड,पालगड हे किल्ले होते. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर शिवाजी महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच सुर्वेंची तारांबळ उडाली व मंडणगड सोडून आपली जहागिरी असलेल्या शृंगारपूरला पळून गेला. महाराजांनी श्रृंगारपुरवर हल्ला केला. त्यावेळी दळवींचे कारभारी (दिवाण) पिलाजी शिर्के यांची योग्यता पाहून महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामिल करुन घेतले. २९ एप्रिल १६६० ला शिवाजी महाराजांनी शृंगारपुर ताब्यात घेतले.
त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी शृंगारपुरच्या बाजुने चाल करुन प्रचितगड ताब्यात घेतला. ईथे महाराजांना गुप्तधनाचे हंडे सापड्ल्याचे सांगितले जाते. कोकणातल्या घाटवाटा सारख्या खराब व्हायच्या म्हणून तानाजीला महाराजांनी घाटवाटा दुरुस्त करण्यासाठी याच परिसरात तैनात केले.
पुढे पिलाजीची मुलगी जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सभेदार म्हणुन नेमणुक केली. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांमधील लेखक , कवी जागा झाला. त्यांनी “बुधभूषणम” हा संस्कृत ग्रंथ लिहिला. “नायिकाभेद”, “नखशिक”, “सातसतक” हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले. थेट उल्लेख नसला तरी या काळात संभाजी राजे प्रचितगडावर नक्की येउन गेले असणार. पुढे मात्र या गडाने एक करुण प्रंसग पाहिला. मुकर्बखानाने संगमेश्वरला संभाजी राजाना पकडून शक्य तितक्या त्वरेने घाटावर न्यायचे ठरविले. मात्र प्रचितगड तर मराठ्यांच्या ताब्यात, त्यामुळे शेजारच्या मळे घाटाने संभाजी राजाना कराड-वडूज मार्गे पेडगावला नेले. हि विटंबणा खिन्नपणे प्रचितगड पहात राहिला. पुढे मात्र ईंग्रजांचा सह्याद्रीवर वरवंटा फिरेपर्यंत प्रचितगड मराठ्यांकडे राहिला. अखेरीस १० जुन १८१८ ला कनिंगहॅम याने प्रचितगडाचा ताबा चतुरसिंह यांच्या कडून मिळविला. या लढाईतच प्रचितगडाचा दरवाजा आणि पायर्या नष्ट झाल्या.
— साभार
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची