मुंबई : वृत्तसंस्था । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. संजय राठोड हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले असून, भेटीत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं सरकारला पूर्णपणे कोडींत पकडले असून, राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याचं बोललं जात आहे. अधिवेशन काळात विरोधकांकडून सरकारची कोडीं होण्याची भीती असल्यानं राठोडांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, असंही बोललं जात असतानाच आज संजय राठोड सपत्नीक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्याचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षानिवासस्थानी दाखल झाले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधीच संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानं राजीनामा देण्याची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्री आणि संजय राठोड होण्याआधी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनाम्यासंदर्भात अप्रत्यपणे संकेत दिले होते. राऊतांच्या ट्विटची चर्चा होत असतानाच राठोड वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता मुख्यमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार की, चौकशी नंतर निर्णय घेणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं.