संजय राऊत यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? : राधाकृष्ण विखे पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) बाळासाहेबांच्या काळात धारदार अग्रलेखांची परंपरा होती. तेव्हा खरे रोखठोक अग्रलेख असत. आजच्यासारखी लाचारी तेव्हा नव्हती. आज शिवसेनेचे प्रवक्तेपद सोडून काँग्रेस समितीचे प्रवक्तेपद टाळेबंदीच्या काळात स्वीकारले का? अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामनातील अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले आहे.

 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टूरटूर’ या शीर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकात आपण माझ्यावर थेट अग्रलेख लिहिलात, याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपल्याच शब्दात सांगायचे तर मी सध्या वनवासात आहे. मी राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे असा सल्लाही आपण दिला आहे. फक्त जनता जनार्दनाच्या साक्षीने एवढेच सांगू इच्छीतो की मी आपल्या कृपेने राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे आपल्या सल्ल्याने राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील. तुमचा हा बेगडीपणा एव्हान लोकांच्या लक्षात आला आहे. एकीकडे राजभवनाबद्दल धमकीवजा भाषा वापरायची आणि दुसरीकडे वाकून, लवून कुर्निसात करायचा हे कोलांटीउडीचे डोंबारी राजकारण आपण किती सहजगत्या करता हे अलीकडे महाराष्ट्राने बघितल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content