पुणे : वृत्तसंस्था । राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. भाजपा विरोधात शिवसेना राष्ट्रवादीशी युती करून कशा पद्धतीने या निवडणुका लढेल, या बद्दल त्यांनी आज सूतोवाच केलं.
आगामी पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढायची हे सूत्र ठरलं आहे. ” शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र राहतील. त्यात काँग्रेसला कसं सामावून घ्यायचं, त्या बद्दल चर्चा करु” असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुण्यात सांगितलं.
“ज्या शहरात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा” असे संजय राऊत म्हणाले. मुंबई, कल्याण-डोंबिवली, संभाजीनगर, नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे. त्या तुलनेत इतर पक्षांची ताकद कमी आहे असे संजय राऊत म्हणाले.
“पुणे, पिंपरी- चिंचवड अशा काही महापालिका आहेत, जिथे राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणुका एकत्र कशा लढायच्या, या बद्दल अजित पवारांबरोबर चर्चा करु” असे संजय राऊत म्हणाले. एकत्र निवडणुकूच लढलो तर निश्चित सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरुवात होईल असे संजय राऊत यांनी सांगितले.
इंदिरा गांधी यांनी त्यावेळी जाहीरपणे आणीबाणी लावली होती. पण आता छुप्या पद्धतीने आणीबाणी लावली आहे. जे आणीबाणी मध्ये होत होतं. तेच आता होत आहे. त्यावेळी आणीबाणीच्या दरम्यान समाजिक, सिनेसृष्टी मधून विरोध होत होता. त्यावर ते म्हणाले की, ते सेलिब्रिटीच एका राष्ट्रीय विचाराचे होते. ते कमिटेड होते. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबध होता. त्या वेळच्या लोकांचा सामाजिक चळवळी सोबत जवळचा संबध होता. त्यांना ते राष्ट्रीय भान होतं.
नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याच विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर ते म्हणाले की, अब्दुल कलाम यांना अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांनी राष्ट्रपती केले आहे. अब्दुल कलाम यांना सर्वांनी पाठिंबा दिला होता. तेव्हा राष्ट्रीय राजकारणात हे मोदी नव्हते. माझ्या माहितीनुसार, पण आता प्रत्येक गोष्टीचे श्रेय काही जण घेत असतात. त्यातून त्यांच हसू होतं. लोक त्यांच्या विनोदावर देखील हसत असतात. पण चंद्रकांत दादांच्या महितीमुळे ज्ञानात भर पडली.