संजय राऊत यांचा आता संपुआला नव्याने सल्ला

 

 

मुंबई : वृत्तसंस्था | महाराष्ट्रात असलेला सत्तेचा फॉर्म्युला केंद्र पातळीवर देखील UPA नं राबवायला हवा, असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

 

राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अनेक मुद्द्यांवरून सरकारला टार्गेट केलं जात आहे. सरकार अपयशी ठरल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार हे आदर्श सरकार असल्याचं म्हटलं आहे. इतक्यावरच न थांबता, संजय राऊत यांनी यावरून काँग्रेसप्रणीत युपीएला देखील सल्ला दिला आहे.

 

काही दिवसांपूर्वीच “शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करायला हवं”, असं विधान संजय राऊतांनी केलं होतं. त्यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. भाजपासोबतच काँग्रेसने देखील या विधानावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी केंद्रातील काँग्रेसप्रणीत युपीएला सल्ला दिला आहे.

 

महाराष्ट्राने देशाला एक नवा राजकीय मार्ग दाखवल्याचं राऊत म्हणाले आहेत. “महाराष्ट्रानं देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असून देखील तीन वेगवेगळ्या पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.  युपीएनं हा प्रयोग देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील देशातल्या २७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये याचा उल्लेख केला आहे”, अशी पुस्ती देखील राऊतांनी जोडली आहे.

 

सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची हाक यावेळी संजय राऊतांनी दिली. “सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा. १९७५ मध्ये जय प्रकाश नारायण यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणलं होतं. पण दुर्दैवाने आज तसं नेतृत्व देशात नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.

 

आता राऊतांच्या या वक्तव्यावर देखील राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Protected Content