नाशिक (वृत्तसंस्था) दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी खासदार आणि शिवेसना नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या वादात मला पडायचे नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होते.परंतू राऊत यांनी ते वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. ते सर्वच काही माहिती नसतात. महमद अली रोडवरील माझ्या एका सभेत हाजी मस्तान होता. त्यानंतर मोठे वादळ उठले होते. मात्र त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हते, असेही पवारांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्या वक्तव्यापासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचे नाही. मात्र इंदिरा गांधींबद्दल त्यांनी बोलायला नको होते, हे आमचे मतं आहे. त्यांनी ते मागे घेतले आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडला आहे, असेही शरद पवार म्हणाले.