भुसावळ, प्रतिनिधी। कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर झाल्याने हातावर पोट भरणार्यांचा रोजगार गेल्याने त्यांनी पायपीट करीत आपापल्या गावांची वाट धरली आहे. मजल-दरमजल करीत अनेक गोरगरीब मजूर डोक्यावर सामानाचे गठोडे ठेवून जळगावकडून मुक्ताईनगर, वरणगाव, बुलढाण्याकडे निघाले आहेत. या गोर-गरीबांना दोन वेळच्या पोटभर जेवणाची सोय शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉटेल न्यू पंजाब खालसाचे संचालक सारंग उर्फ छोटूभाऊ पाटील यांनी स्व-खर्चातून केली आहे.
प्रशासनाने संचारबंदीच्या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले असून त्याचे कडेकोट पालनकरून सोशल डिस्टनसिंगचा काटेकोर वापर व अमलबजावणी छोटू पाटील करीत आहे. केवळ येणार्या-जाणार्या वाटसरूंना स्व-खर्चातून जेवण व चहा-पाण्याची सोय करून दिली आहे. अहोरात्र या प्रवाशांची भूक भागवून कुठलाही गाजावाजा न करता खर्या अर्थाने छोटूभाऊच्या कार्यातुन प्रवाशांना सहारा मिळाल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. पायपीट करणार्या पादचार्यांना महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यू पंजाब खालसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हातावर पोट भरणार्या मजुरांकडे पैसे नसल्याने त्यांनी पायीच घराकडची वाट धरली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून छोटूभाऊ पाटील यांनी स्व-खर्चातून येणार्या जाणार्या प्रवाशांची जेवण व चहा-पाण्याची अहोरात्र सोय करून दिली आहे. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे सारंग पाटील यांनी यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे वाटसरूंनी त्यांचे आभार मानले आहेत.
चिमुकल्यांसाठी दुध-बिस्कीटाची सोय
गावाकडे निघालेल्या वाटसरूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील असल्याने लहान मुलांसाठी दुधासह बिस्किटाची सोयदेखील छोटूभाऊ पाटील यांनी करून दिली आहे. शिवाय मजल-दरमजल करीत पायपीट करणार्या प्रवाशांसाठी अंगदुखी तसेच तापाबाबत सहज औषध दुकानांवर उपलब्ध होणार्या गोळ्यादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.