चोपडा, प्रतिनिधी । कोरोना विषाणूूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉक डाऊनमुळे सर्वांना घरात राहणे अनिवार्य झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्तरावर काम कामे ठप्प झालेली आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालये ही बंद असल्याने विद्यार्थी व शिक्षकांना सक्तीने घरात राहणे क्रमप्राप्त झाले असल्याने महिला मंडळ माध्यामिक विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या वर्गनिहाय असणाऱ्या व्हाट्सअप ग्रुपवर घटकावर आधारित ऑनलाइन टेस्ट तयार करून विद्यार्थ्यांना घरूनच त्या सोडवायला दिल्या आहेत.
विध्यार्थ्यांना काही लिंक्स, निबंध लेखन स्पर्धा, चित्र रंगवा स्पर्धा, शब्द कोडी, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न यासारखे विविध उपक्रम गृहकार्य म्हणून दिले जात आहे. यास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. शासनाच्या दीक्षा ॲप तसेच डायटतर्फ पुरवण्यात येणाऱ्या लिंक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात इ. १० वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुपवरूनच दहावीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, त्यानुसार लेखन कौशल्यावर तसेच व्याकरणावर आधारित घटकांचे व्हिडिओ, ऑडिओ विद्यार्थ्यांना सरावासाठी दिले जात आहेत. विद्यार्थी दिलेले उपक्रम किंवा कृती पूर्ण करून शिक्षकांकडे ग्रुपवर पाठवीत आहेत व शंका समाधान करून घेत आहेत. शाळा बंद असल्याने गावी गेलेल्या विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधून याबद्दल माहिती दिली जात आहे. मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक दीपक शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक या पद्धतीने अनोखी शाळा चालवत आहेत याचे विद्यार्थी व पालकांनी स्वागत केले आहे. त्यासोबतच विद्यार्थी व पालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाचे काळजी यासंदर्भात योग्य त्या सूचना व प्रबोधनपर माहिती दिली जात आहे. या उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्ष पुनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, प्रा. आशिष गुजराथी यांनी कौतुक केले.