श्री क्षेत्र चांगदेव दुर्लक्षित; भक्तनिवास व सौंदर्यीकरणाची अपेक्षा

जळगाव तुषार वाघुळदे । जिल्ह्यात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र चांगदेव येथील प्राचीन मंदिराकडे शासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. भक्तनिवासासह इतर सोयीसुविधा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पुरातत्त्व खात्यानेही याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे हे तीर्थक्षेत्र काहीसे दुर्लक्षित राहिले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील “न भूतो न भविष्यती” असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकीक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर. . ! त्याचप्रमाणे जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मुक्ताबाई, श्री क्षेत्र मेहूण आणि श्री क्षेत्र चांगदेव हे होय. श्री चांगदेव महाराज हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होत. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. पण त्यांचा अहंकार गेला नव्हता, यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. येथे 12 व्या शतकातील चांगोबुआचं मंदिर आहे. चांगदेव हे ज्ञानदेवांच्या काळात वटेश्वर या नावानं ओळखलं जातं होतं.

महाराष्ट्रात भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात आहे. श्री क्षेत्र चांगदेव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोन दिवसीय यात्रा देखील भरत असते. पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत असते. मंदिर परिसर फुलून जातो. टाळ – मृदुंगाच्या निनादाने परिसर दुमदुमून जात असतो. अनेक भाविक तापी- पूर्णाच्या पवित्र संगमावर नौकानयनाचा आनंद घेतात. मात्र हा परिसर अत्यंत भकास असून पुरातत्व खात्याचं आणि लोकप्रतिनिधींचं याकडे खूप दुर्लक्ष होत आहे, भाविकांना जर या तीर्थक्षेत्र स्थळी मुक्काम करायचा असल्यास कुठलीच सोय नाही. जसे श्री क्षेत्र मुक्ताबाई येथे भक्तिनिवास आहे आणि इतर सुविधा आहेत तशा सुविधा या मंदिराच्या परिसरात व्हायला हव्यात अशी मागणी भाविकांची आहे. मंदिराच्या बाहेर काही भग्न अवस्थेतील मूर्तीही आहेत. तर उत्खननाच्या वेळेस विष्णू, शिव, दुर्गा, वरुण, अप्सरा आणि साधू आदी मूर्तीचे अवशेष इतस्ततः पडलेल्या आहेत. मंदिराचे खांब नष्ट झालेले आहेत. छत पडलेले आहेत. दगडाच्या बांधकामातील काही ठिकाणचे सिमेंट निघाल्याने जीर्ण स्वरूप प्राप्त होत आहे. आजच्या काळात उभे दिसणारे मंदिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ( इस 1766 ते 1795 ) यांच्या काळात बांधले गेले असे मानले जाते. संगम परिसरात घाणीचे साम्राज्य असून झाडेझुडपे वाढली आहेत.

मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे ही बाबही चिंतेची आहे. या मंदिराच्या परिसरात भक्तिनिवास उभारण्यात यावे आणि विकास व्हावा अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे. भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद ‘ याची देही, याची डोळा साठवावा ‘ असाच असतो.

स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासू । दावी मग ग्रासू । प्रगटला करी ।
मला शिष्य करून घ्या असे चांगदेव महाराजांनी सांगितले तेव्हा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व सोपानदेवांनी चांगदेवाला मुक्ताबाईंच्या स्वाधीन केले. आणि सांगितले की, ‘यास आत्मज्ञानाची प्रचिती आणून द्या’. चांगदेवाने मुक्ताबाईंच्या पायावर डोके ठेवले. मुक्ताईने चांगदेवाच्या डोक्यावर हात ठेवला.

निरविला चांगा मुक्ताबाई प्रती, यासी करा प्रती आत्मज्ञानी ।। चांगदेवे चरणी न्यासिला मस्तक । मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ।।

जेव्हा चांगदेव महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीस गेले, तेव्हा त्यांना खूप उत्कंठा लागली होती. चंद्रभागेत त्यांनी स्नान केले. पुंडलिकी संतांचे वर्णन केले.
ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे। भले रे भले रे दास गोपाळाचे ।। जागवा जागवा हरीचे । दास गोपाळाचे।।
समता, बंधुता आणि मानवता अशा चिरंतन मूल्यांचा पुरस्कार संतमंडळींनी अविरतपणे केला आहे. ‘ सदाचाराने वर्तावे आणि हरिनाम गावे ‘ हा मोक्षप्राप्तीचा सहजसोपा मार्ग संत ज्ञानेश्वरांनी सांगितला आहे. तापी- पूर्णा संगमाचे मनोहारी दृश्य पाहून सर्वांचे मन मोहरून जाते. संगमाजवळ उतरताना तेथे स्वच्छता असावी अशी मागणी होत आहे. . शेवटी
माझी मुक्ताई मुक्ताई, दहा वर्षाचं लेकरू । चांगदेव योगियाने तिले मानला गुरू ।। सन तेराशे पाच ( शके 1227 )मध्ये संत चांगदेवांनी समाधी घेतली. आज हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परिसराचे सौंदर्यीकरण होण्याची गरज असून गांभीर्याने लक्ष घालून वास्तू जतन होणे अपेक्षित आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/180903760017576/

Protected Content