भुसावळ प्रतिनिधी । संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. त्यामुळे संत एकनाथांच्या अभंगात असलेल्या नवविधाभक्तीचे दर्शन वाचकांना होऊ शकेल.
भुसावळ येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेचे मराठी विषय अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना २०१२ मध्ये संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार या विषयावर प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाचे ग्रंथरूप व्हावे अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केल्याने श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिन श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या ग्रंथाला प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांची प्रस्तावना तर प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर नांदेड यांचा अभिप्राय लाभला आहे. प्रकाशकांची भूमिका ह.भ.प. लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी स्वीकारली आहे.
या ग्रंथाचे तीन विभाग करण्यात आले आहे. पहिल्या विभागात अंतरीचे व संत एकनाथ महाराज जीवन चरित्र रेखाटण्यात आले आहे. दुसर्या विभागात संत एकनाथांनी आपल्या अभंगातून श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नऊ मार्गांनी केलेली भक्ती विविध संदर्भ देऊन सोदाहरण स्पष्ट करण्यात आली आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणार्या, संत साहित्याची गोडी असणार्या व संत साहित्य अभ्यासणार्या वाचकांसाठी हा ग्रंथ निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.