जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या संकटात शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनासाठी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने ५ दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार उद्घाटन शनिवारी आमदार गिरीष महाजन यांच्याहस्ते करण्यात आले.
आज जगावर जे कोरोनाचे संकट आले, त्यामध्ये शेतकरी सुद्धा हवादील झाला आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी मार्गदर्शन केले जावे, या प्रेरणेने उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या संकल्पनेतून ५ दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. सुरुवातीला विकास पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. विकास पाटील म्हणाले की, शेती विषयक कार्यक्रम ‘आमची माती आमचे जल, जल व्यवस्थापन तंत्र’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार आयोजित केल्याचे हेतू कथनात सांगितले. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते.
पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफणारे पोपटराव पवार साहेब यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या हिवरे बाजार या गावांमध्ये पाणी अडवणे, पाणी जिरवणे, पाणी फाउंडेशन, जलव्यवस्थापन यासारख्या योजना राबवून “आदर्श गाव” असा दर्जा गावाला मिळून दिला. आपल्या गावाला शेती व्यवसाय मध्ये विविध प्रकारच्या जलव्यवस्थापनाच्या योजना राबवून शेतीमध्ये नवीन परंपरा त्यांनी निर्माण केली असे वक्तव्य केले. या कोरुना काळात हजारो शेतकऱ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधल्याचीही माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील शेतकरी व पाणी व्यवस्थापन याविषयी विचार करण्याची गरज असल्याचा विचार त्यांनी मांडला. कोरोनाने आपल्याला एकत्र येऊन काम करण्याची संधी दिली असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या काळात गावातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. गावातील आरोग्य, व्यसनाधीनता, तरुण बेरोजगारी, शिक्षण, स्त्रियांच्या तसेच मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावर विचार व्हायला हवा, असे वक्तव्य त्यांनी केले.
हिवरेबाजार गावात विविध सरकारी योजना गुणदाईपणे राबवून सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून कमी पाण्याची पिके घेऊन शेतकऱ्यांचा उत्कर्षाचे तंत्र त्यांनी सांगितले. बोर बंद करून विहिरीतून सिंचन केले जावे असाही विचार त्यांनी तमाम शेतकरी बांधवांना दिला. भूगर्भातून शेकडो फुटावरून केल्या जाणाऱ्या पाणी उपशामुळे भविष्य काळामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे असेही भाकीत त्यांनी वर्तवले. त्यांच्या हिवरेबाजार गावाविषयी बोलताना ते म्हणाले की नजवळजवळ 112 देशांचे लोक त्यांच्या हिवरे बाजार या गावाला भेट देऊन गेल्याचे ते म्हणाले. डोंगराळ जमीन सपाट करून नापीक जमिनीची मशागत करून, नदीतील गाळ काढून, शेतावर टाकून नापिक जमिनी सुपीक केल्याचे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना नापिक जमिनी सुपिक करण्याचे तंत्र सांगितले.शेवटी उत्तर महाराष्ट्र खानदेश मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी या कोरोना काळातही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेबिनार च्या माध्यमातून चर्चा करून शेतकऱ्यांविषयी कणव व्यक्त केले.
राज्यस्तरीय ऑनलाइन वेबिनारच्या पहिल्या दिवशी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रदिप अहिरे, कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्ष एन.एम.भामरे, एल.आर.पाटील, सचिव दीपक पाटील, कोषाध्यक्ष ए.जी. पाटील, सुनिता बोरसे, किशोर पाटील, विनोद शेलकर आदी मान्यवर या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.