जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ त्वरित मिळावा अन्यथा भारतीय जनता पार्टी जळगाव तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी यांना तालुका अध्यक्ष गोपाळ भंगाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भारती एक्सा या पीक विमा कंपनीकडून कापूस, सोयाबीन, मूग या पिकाचा पीक विमा उतरवलेला होता. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केल्या होत्या तर काही शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत सदर कंपनीकडे आपल्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातील काही ठराविक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना यांना लाभ मिळालेला नसून ज्या शेतकऱ्यांना या भरपाईचा लाभ का मिळाला नाही त्यासंदर्भात विमा कंपनीकडून माहिती मागवण्यासाठी विनंती अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आली. नुकसान भरपाई का म्हणून नाकारली याबद्दलची कारणे सुद्धा मागविण्यात आली आहेत. सर्व शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई न मिळाल्यास यासाठी भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा विमा कंपनीकडे पाठपुरावा केला जाणार आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, सरचिटणीस अरुण सपकाळे पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.