पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव विधानसभा क्षेत्र व परिसरात शेती व शेतमालाचे सततच्या पावसाने नुकसान झाले असून कापसाला ६ हजार रुपयांचा भाव देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी इ-मेलद्वारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले की, पाचोरा – भडगाव विधानसभा क्षेत्र व परिसरात शेती व शेतमालाचे संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. परिसरात पाऊस उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरण्या लांबल्या आणि नंतरच्या काळातील परिस्थिती इतकी भयानक होती की, उडीद, मूग, सोयाबीन हे नगदी पिके जवळजवळ निम्मे हातातून गेले. कपाशीची परिस्थिती खूप चांगली होती. मात्र सततच्या पावसाने इतके झोडपले की, जवळजवळ ६० ते ७० टक्के कापसाची बोंडे झाडावरच सडली, कीडली आणि नष्ट झाली. परिसरातील कापूस हे प्रमुख नगदी पीक असल्याने आणि शेतकऱ्यांचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने फार मोठी झळ सहन करावी लागत आहे. जो काही कापूस हातात येणार आहे त्या कापसाला ६ हजार रुपये भाव मिळाल्यास शेतकरी आपली परिस्थिती थोड्याफार प्रमाणात सावरू शकेल. तरी कापसाला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळवून देण्या संदर्भातील निर्णय दिवाळी अगोदर घ्यावा व हमी भावात शासकीय खरेदी केंद्र सुरु करावेत. या बाबतच्या सूचना संबधितांना व्हाव्यात जेणेकरून ही दिवाळी शेतकरी आनंदाने साजरी करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्या शासनाकडे पाठपुरावा करून आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना या प्रतिकूल परिस्थितीतून सावरण्यासाठी पुढाकार घ्यावा . यापत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे गटनेते संजय वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलिल देशमुख, शहर अध्यक्ष सतिष चौधरी, नगरसेवक विकास पाटील, अजझर खान, माजी आमदार दिलीप वाघ यांचे स्वीय्य सहाय्यक गोपी पाटील, डिगंबर टोनपे उपस्थित होते.