चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शेतकी संघात शेतकर्यांच्या नावाने व्यापार्यांचा विक्रीसाठी जाणारा हरभरा आज स्वत: आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी धाड टाकून पकडला. आपण स्वत: शेतकरीपुत्र असून शेतकर्यांना नाडणार्यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
चाळीसगाव येथील शेतकी संघात शेतकर्यांच्या नावाने विक्रीसाठी जाणारा हरभरा हा स्वत: आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पकडल्याचे खळबळ उडाली आहे. ही शेतकर्यांची फसवणूक असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान, या संदर्भात माहिती देतांना आमदार चव्हाण म्हणाले की, चाळीसगाव येथील शेतकी संघात शेतकर्यांच्या नावाने व्यापार्यांच्या मका, ज्वारी, हरभरा विकला जात होता याची मला माहिती मिळाली होती. यामुळे खरे शेतकरी बाजूला राहून शेतकी संघाचे काही पदाधिकारी यांच्या संगनमताने काही मोजके व्यापारी हे आपला शेतीमाल विकत होते. दोनच दिवसांपूर्वी याबाबत आपण राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सविस्तर पत्र देऊन खर्या शेतकर्यांचा शेतात पडून असलेला शेतीमाल तात्काळ खरेदी करण्यात यावा अशी विनंती केली होती. मात्र याबाबत काहीही कार्यवाही होत नसल्याने आज मला मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून एका व्यापार्याचा हरभरा विक्रीसाठी शेतकी संघात येत असल्याचे कळाले. यानुसार शेतकर्यांच्या नावाने मात्र प्रत्यक्षात व्यापार्यांच्या मालकीचा हरभरा पकडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, एकीकडे सुट्या आणि पावसाचे कारण दाखवून कापूस व मका खरेदी बंद केली जाते मात्र दुसरीकडे रविवारी सुट्टी असूनही व्यापार्यांचा माल खरेदी केला जात असल्याचा गंभीर प्रकार माझ्या लक्षात आला. जवळपास दोन मोठ्या वाहनांमध्ये १०० क्विंटल हुन अधिक हरभरा त्या ठिकाणी मोजला जात होता. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी, तहसिलदार व पोलीस प्रशासन यांना कळवून या प्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत. यात जे कुणी शेतकर्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे सहभागी असतील त्यांची गाय केली जाणार नाही. शेतकर्यांना जे नाडतील त्यांना आपण सोडणार नसून तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन देखील आ. मंगेशदादा चव्हाण यांनी केले.
खालील व्हिडीओत पहा आमदार मंगेशदादा चव्हाण नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/265077424574201