भुसावळ,प्रतिनिधी । यावर्षी कोरोणामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीसह शेतीमाल अद्यापही घरात पडून आहे. कर्जमाफीचे प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे कर्ज वाटप बंद आहे. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कामे नसल्यामुळे शेतकरी वर्गात चांगलच अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते मोफत देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी तहसील कार्यालयत दिले आहे.
अगोदरच शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला होता. त्यांना दिलासा मिळावा , यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला अनुसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळेस कर्जमाफीची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील लोकांना दिलासा मिळाला . तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. याप्रक्रिया सुरू असतांना देशात व राज्यात कोरोना ने कहर केला. त्यामुळे कर्जमाफीची योजना राबविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी नवीन कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. तर कोरोनामुळे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे व मजुरांचे काम बंद पडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्याचप्रमाणे कापूस खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू असतांनाच कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारणपुढे करून सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच कापूस खरेदी केंद्रांवरील कापूस खरेदी थांबवण्यात आली होती. या परिस्थितीत कोरोणा लागण वाढत असल्यामुळे कापूस खरेदी केंद्रे अद्यापही बंद आहे . त्यामुळे ४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही कापूस पडून आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने मजुरांना देखील मजुरीला मुकावे लागत असण्याकडेही जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी लक्ष वेधले आहे.