शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथे आज शुक्रवार दि. १ ते ३ मे २०२० अश्या तीन दिवसीय जनता कर्फ्युला सकाळी ७ वाजेपासून सुरवात झाली. जनतेने स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या या जनता कर्फ्युला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
जनता कर्फ्यूत सोयगाव रोडवरील पाण्याच्या टाकी जवळ ,लिहा रोडवर ,प्राथमिक आरोग्य केंद्र खिंडी दरवाजा, रेल्वे स्टेशन शेंदूर्णी हे गावातील मुख्य प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग करून मुख्य रस्ते सील करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. नागरिकही आपापल्या घरात बसून असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. आजच्या जनता कर्फ्युला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे व विविध सामाजिक संघटना, व्यापारी असोसिएशन व शेंदूर्णी शहरातील पत्रकार बांधवांनी समर्थन दिले आहे. बंदमध्ये काही अनुचित प्रकार किंवा अफवा पसरू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे,पोहेकॉ किरण शिंपी,प्रशांत विरणारे, गजानन ढाकणे आदींनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. बंदमधून डॉक्टर व मेडिकल सेवा वगळण्यात आल्याने येथील प्राथमिक रुग्णालयात रुग्णांना नियमित सेवा पुरविण्यात येत असल्याचे वैधकीय अधिकारी राहुल निकम यांनी सांगितले आहे. तीन दिवसीय जनता कर्फ्युला नगरपंचायतकडून आधीच संमती देण्यात आली असुन गावात तोंडाला बिना मास्क विनाकारण फिरणाऱ्याकडून दंड वसुली करण्यात आली आहे. आपणच आपला रक्षक म्हणून कोरोना आपत्तीच्या वेळी योद्धे म्हणून सहकार्य करावे व लॉक डाउन नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.