शेंदूर्णी येथे पाच दिवसांचा स्वयंस्फुर्त लॉकडाऊन

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । आजवर कोरोनाच्या संसर्गाला यशस्वीपणे थोपवून धरणार्‍या शेंदुर्णीकरांनी १३ जूनपासून स्वयंस्फुर्त लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला असून यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

येथे भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,काँग्रेस, मनसे या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक यांच्यात आज संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यात १३ ते १७ जूनपर्यंत पाच दिवस अत्यावश्यक मेडिकल, दवाखाने,दूध व कृषिकेंद्र या सेवा वगळता इतर सर्व दुकाने अस्थापने कडकडीत बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिनांक १८ ते ३० या काळात परवानगी देण्यात आलेली दुकाने अस्थापना दररोज सकाळी ९ ते दुपारी ३ या काळातच सुरू राहतील. दुपारी ३ नंतर सर्व दुकाने बंद करणे बंधनकारक राहील असे एकमताने ठरले आहे. तसेच या व्यतिरिक्त दर बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात येईल असेही ठरले. तसे निवेदन सर्वपक्षीय प्रतिनिधी, व्यापारी संघटना, पत्रकार नागरिकांचे वतीने शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उप पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांना देण्यात आले आहे. येत्या शनिवार पासून बुधवार पर्यंत ५ दिवस शेंदूर्णी कडकडीत बंद राहणार असल्याने परिसराचे खेड्यातील लोकांनी शेंदूर्णी येथे नियमित खरेदी साठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, नगराध्यक्ष पती अमृता खलसे,पंडितराव जोहरे, मनसेचे डॉ.विजयानंद कुलकर्णी,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल, काजेश कोटेचा, गिरीश कुलकर्णी, राष्ट्रवादीचे धिरज जैन, रविंद्र गुजर,योगेश गुजर,गजानन धनगर, काँग्रेसचे फारूक खाटीक,शिवसेनेचे संजय सुर्यवंशी,शेंदूर्णी नगरपंचायत नगरसेवक निलेश थोरात, सतीश बारी,अलीम तडवी,गणेश कोळी श्रीकृष्ण चौधरी इत्यादी तसेच डॉ.पंकज गुजर,संजय गायकवाड,विजय धुमाळ,शंकर बारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात वाढत्या कोरोना संक्रमण विषयावर विचार विनिमय होऊन चिंता व्यक्त करण्यात आली शेंदूर्णी पासून आठ ,दहा किलोमीटर अंतरावर दोंदवाड़ा,नाचनखेडा, पहुर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर नाचनखेडा व जामनेर येथील काही रुग्णाला कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. अश्या परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असतांना शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीत नागरिकांच्या व नगरपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना थोपवण्यात आजपर्यंत जरी यश आले असले तरी सध्याचा काळ हा कोरोना समूह संक्रमण काळ असल्याने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

Protected Content